प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचे मतदान २ डिसेंबरला पार पडल्या. परंतू मतमोजणी ३ डिसेंबरऐवजी तब्बल २० दिवसांनी म्हणजे २१ डिसेंबरला घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यामुळे स्थानिक राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. मतमोजणी लांबणीवर गेल्याने उमेदवार, त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांची धडधड आणखी वाढली असून सर्वांचे लक्ष स्ट्रॉंग रूमकडे खिळले आहे. मतदानानंतर बंदिस्त करण्यात आलेल्या इव्हीएम मशीनचे रक्षण करण्यासाठी पोलिसांनी डोळ्यात तेल घालून पहारा दिला आहे. संपूर्ण स्ट्रॉंग रूम परिसरावर तिसऱ्या डोळ्यची अर्थात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सतत नजर ठेवण्यात आली आहे. सुरक्षा, नियमबद्धता आणि पारदर्शकता याबाबत प्रशासनाने कोणतीही ढील न देता कडेकोट व्यवस्था उभारली आहे. मतमोजणी २० दिवस पुढे, उमेदवारांची धाकधूक वाढली मतदानाच्या दिवशीच नागपूर खंडपीठाने मतमोजणी २१ डिसेंबरला घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला. यापूर्वी ३ डिसेंबर निश्चित असलेली मतमोजणी अचानक पुढे ढकलल्याने विविध स्तरांत चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, मतदान झाल्या नंतर इव्हीएम मशीन ठेवण्यासाठी प्रशासनाने सुरक्षित, बंदिस्त आणि कडक निगराणीत असलेल्या स्ट्रॉंग रूम तयार केल्या आहेत. मशीन सील करून ते कक्ष पोलिसांकडे सोपविण्यात आले आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक, नोंदींची कडक तपासणी आणि २४ तास निरीक्षण अशी काटेकोर व्यवस्था तैनात आहे. तिसऱ्या डोळ्याची सतत नजर स्ट्रॉंग रूम परिसरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हा संपूर्ण सुरक्षा योजनेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. या कॅमेर्यांचे फीड पोलीस नियंत्रण कक्षात आणि स्ट्रॉंग रूमच्या देखरेख विभागात सातत्याने पाहिले जात आहे. हे कॅमेरे प्रवेशद्वार, आसपासचा परिसर आणि मशीन ठेवलेला हॉल अशा प्रत्येक दिशेने लावण्यात आले आहेत. कोणत्याही संशयास्पद हालचालीची तात्काळ नोंद घेतली जाऊन त्वरित कारवाई करण्याचा प्रोटोकॉल प्रशासनाकडून आखण्यात आला आहे. तापलेले राजकीय वातावरण झाले शांत निवडणूक प्रचाराचा अंतिम टप्पा अत्यंत गढूळ होता. विविध रॅल्या, प्रचार फेऱ्या, घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोपांनी गेल्या दोन आठवड्यांत वडगावची हवा तापली होती. निकालास दोन आठवडे शिल्लक असल्यामुळे राजकीय पक्षांना प्रतीक्षा काळ पाळण्याची वेळ आली आहे. निवडणुका स्थगित असलेले काही नगरपालिकांचे प्रश्न निकाली काढून मतमोजणीसाठी २१ डिसेंबरची तारीख निश्चित करण्यात आली. त्यानंतर ताबडतोब प्रशासनाने स्ट्रॉंग रूमची व्यवस्था उभारून इव्हीएम मशीन सुरक्षित ठेवली. सध्या स्ट्रॉंग रूम परिसर शांत असला तरी मतपेटीत काय बंद आहे, या प्रश्नाने उमेदवार आणि राजकीय पक्षांची धाकधूक मात्र कायम आहे.