प्रभात वृत्तसेवा पिंपरी – निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेकजण आरोप करत असल्याचे महेश लांडगे यांनी सांगितले. ते वैतागले होते. पण निवडणुका आल्यानंतर अनेकांना कंठ फुटतो. त्यांच्याकडे सांगायला काहीच विकासकामे नाहीत, मुद्दे नाहीत. त्यामुळे विकासच्या मुद्द्यावर न जाता वादावादी करण्याचा प्रयत्न ते करत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शनिवारी (दि. १०) आकुर्डी येथे केली. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आकुर्डीमध्ये जाहीर सभा झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, निवडणूक प्रमुख व आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, अमित गोरखे, उमा खापरे आदी उपस्थित होते.पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राज्यात महायुतीत सत्तेत असलेले भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या नऊ वर्षांमध्ये शहरामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरून भाजपच्या स्थानिक नेत्यांना घेरले आहे. उपमुख्यमंत्री पवार आणि आमदार महेश लांडगे यांच्यामध्ये यावरून टोकाचा संघर्ष पाहयला मिळत आहे. याबाबत बोलत असताना फडणवीस यांनी लांडगे यांना टीका न करता आपली कामे दाखविण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, हे शहर राज्यातील वेगाने विकसित होणारे शहर आहे. सन २०१४ नंतर राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर या शहराला बदलण्याचे काम आम्ही केले. त्यामुळे शहराचा कायापालट झाला असून आधी ज्यांची सत्ता होती. त्यांना हे जमले नाही. त्यामुळे त्याचा हा रागराग आहे. जेएनयुआरएम अंतर्गत १३ हजार घरांचे बांधकाम केले ते १५ वर्ष आधीच्या सत्ताधाऱ्यांनी रखडवले होते. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर आम्ही पंतप्रधान आवास योजनेतून अनेक ठिकाणी घरे दिली. आता जे टीका करत आहेत, त्यांनी ती घरे जाऊन बघावी. महापालिका शाळांचा दर्जा सुधारला असून आज ५१ हजार विद्यार्थी महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांना डीबीटीच्या माध्यमातून शालेय साहित्य देण्याचे काम आम्ही करतो. महिलांसाठी १३० कल्स्टर उभारत त्यामध्ये महिलांना प्रशिक्षण दिले. त्यामुळे १० हजार महिलांना रोजगार मिळाला आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली आहे. असे अनेक प्रकल्प केले असून पुढे देखील महत्वाची कामे करायची आहेत. त्यासाठी भाजपच्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. निळ्या पूररेषेबाबत पुन्हा सर्व्हे या शहरामध्ये निळ्या व लाल पूररेषेचा मुद्दा आहे. तसा तो अनेक शहरामध्ये आहे. ज्यावेळी याबाबत नियम तयार केला, तो १०० वर्षांपूर्वीच्या गृहीतकांवर आधारित आहे. त्यामुळे या पूररेषांचे पुन्हा सॅटेलाईट व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सह्याने सर्व्हेक्षण करण्यात येईल. तसेच युडीसीपीआरमध्ये बदल करत हा मुद्दा कायमचा सोडवणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.