पिंपरी – पिंपरी–चिंचवड शहर नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. हॉटेल्स, सोसायट्या, क्लब हाऊसेस आणि पर्यटनस्थळांवर साजरा होणाऱ्या जल्लोषाची तयारी जोरात सुरू आहे. नागरिकांकडून कौटुंबिक सहलींचे नियोजन, तर हॉटेल्सतर्फे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आणि खास मेन्यूची घोषणा करण्यात आली आहे. नववर्ष अवघे काही दिवसांवर आले असून पिंपरी–चिंचवडमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील नागरिकांकडून वर्षअखेर आपल्या कुटुंबीय व मित्रपरिवारासोबत साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. एकदिवसीय सहली, पर्यटनस्थळांना भेट, रिसॉर्टवर मुक्काम, तसेच सोसायटी पातळीवरील समारंभांची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे. मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून थर्टी फर्स्टसाठी विशेष पॅकेजेस, डिस्काउंट ऑफर्स, संगीत मैफिली आणि डीजे नाइटचे आयोजन करण्यात येत आहे. अनेक हॉटेल्समध्ये ग्रुप बुकिंग पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचले असून कुटुंबांसाठी वेगळे काउंटर आणि ‘फॅमिली झोन’ तयार करण्यात आल्याची माहिती मिळते. काही ठिकाणी नववर्षाचे स्वागत देवदर्शनाने करण्यासाठी नागरिकांकडून मंदिर, देवस्थान आणि धार्मिक स्थळांकडेही मोठ्या प्रमाणात नियोजन होत आहे. तर तरुण वर्गाने फार्महाउस पार्ट्या, हिल स्टेशन सहली आणि रात्रीच्या काउंटडाउन कार्यक्रमांना अधिक पसंती दिली आहे. मोठ्या सोसायट्यांमध्ये इच्छुक उमेदवाराच्या मदतीने सभागृह, टेरेस आणि ओपन लॉन्सवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. नृत्यस्पर्धा, मुलांसाठी खेळ, स्नेहभोजन, लकी ड्रॉ, बक्षिसांची बरसात अशा उपक्रमांची मुशाफिरी सुरू असून अनेक ठिकाणी “नववर्ष स्वागत संमेलन” या नावाखाली सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची जय्यत तयारी शहर व परिसरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, रिसॉर्ट्स आणि होम-स्टे यांच्याकडून थर्टी फर्स्टच्या रात्रीसाठी वेगळे मेन्यू, बुफे डिनर आणि लाइव्ह काउंटर ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी ऑर्केस्ट्रा, गायन-वादन, तसेच काउंटडाउनसोबत फुगे आणि लाईट शोचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहकांची संध्याकाळ संस्मरणीय करण्यासाठी मालकांकडून विशेष कार्यक्रमांची आखणी करण्यात येत आहे. निवडणूक + नववर्ष — दुहेरी रंगत यंदा महापालिका निवडणुकीचा माहोल आणि नववर्षाचा उत्सव असा दुहेरी योग जुळून आला आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, सहली आणि भोजनावळीचे आयोजन करून मतदारांशी संपर्क वाढवण्याचे धोरण अवलंबले आहे. काही ठिकाणी कुटुंबांसाठी एकदिवसीय सहलींची व्यवस्था करून खर्चाची जबाबदारीही उचलली जात आहे. एकूणच पिंपरी–चिंचवड शहरात नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी जय्यत तयारी सुरू असून ३१ डिसेंबरची रात्र आणि १ जानेवारीचा सूर्योदय नागरिकांसाठी खास ठरणार आहे.