प्रभात वृत्तसेवा पिंपरी – राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आचारसंहिता लागताच शहरातील राजकीय पक्षातील इच्छुक व माजी नगरसेवकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या नियम व मार्गदर्शक तत्त्वांना आदर्श आचारसंहिता म्हणतात. सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, अधिकारी आणि शासन यांना ती पाळणे बंधनकारक असून त्याचे उल्लंघन केल्यास दंड, शिक्षा किंवा उमेदवारी रद्द होण्याची कारवाई होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.पक्ष, उमेदवारांसाठी आचारसंहितेमध्ये विशेष नियम घालून देण्यात आले आहेत. धार्मिक, जातीय किंवा प्रांतीय भावना भडकवणारी भाषणे करता येत नाहीत. मतदारांना खोटी आश्वासने देणे, मतदान केंद्राजवळ प्रचार करणे तसेच दारू वा पैशांचे वितरण करण्यास मनाई आहे. कुणाचेही घर, जमीन, घराच्या भिंतीवर राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रके लावण्यापूर्वी परवानगी आवश्यक आहे. आचारसंहिता काळात सत्ताधारी पक्षाला नव्या योजना, निधी, कार्यक्रम जाहीर करता येत नाही. शिलान्यास, उद्घाटन, भूमिपूजन सारखे कार्यक्रम घेणे, त्यांची जाहिरात करण्यास देखील मनाई आहे. सरकारी वाहन, बंगला किंवा विमानाचा वापर प्रचारासाठी करता येत नाही. मत खरेदी-विक्रीचा प्रयत्न करणे, प्रचार रॅली, सभा, जाहीर कार्यक्रमांमध्ये गोंधळ, हिंसाचार, दहशत निर्माण करणे दंडनीय अपराध आहेत. सोशल मीडियावर खोटी माहिती, द्वेषपूर्ण पोस्ट टाकल्यास सायबर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. याबाबत नागरिकांनी देखील दक्ष राहणे आवश्यक आहे. तर प्रशासनासाठी देखील नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी निष्पक्ष राहणे आवश्यक आहे. कोणत्याही पक्षाला थेट किंवा अप्रत्यक्ष मदत करता येत नाही. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्ह्याच्या स्वरूपानुसार तीन वर्षापर्यंत तुरुंगवास व दंडाची तरतूद आहे. आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असल्यास कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो.