प्रभात वृत्तसेवा पिंपरी – हिंजवडीतील महिंद्रा इंटरनॅशनल शाळेच्या मेलवर शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मेलची दखल घेत बॉम्ब शोधक नाशक पथकाला पाचारण करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी शाळेच्या मेलवर एका अनोळखी मेल आयडी वरून एक मेल आला असून यामध्ये शाळेत बॉम्ब ठेवला असल्याचे नमूद आहे. तसेच, दुपारी शाळेत मोठा स्फोट होणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, मेल निदर्शनास येताच शाळा व्यवस्थापनाने याबाबत पोलिसांना माहीती दिली.घटनेची गंभीरता लक्षात घेऊन हिंजवडी पोलीस, श्वानपथक, बॉम्ब शोधक पथकाने तत्काळ शाळेत धाव घेतली. संपूर्ण परिसर सुरक्षित करून शाळेत सर्वत्र तपासणी सुरू आहे. अचानक पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, हा ईमेल कोठून पाठवला गेला? त्यामागील उद्देश काय? याबाबत सायबर विभाग तांत्रिक तपास करत आहे. प्राथमिक तपासाअंती हा ईमेल खोटा असण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी पोलिसांकडून सर्वंकष तपास सुरू आहे. इ-मेलवरून धमक्या सुरूच बुधवारी हिंजवडीतील महिंद्रा इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब ठेवल्याचा इ-मेल आला. यापूर्वीही शहरातील धन्वंतरी हॉस्पिटल, मेडिकल हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल यांना २०२४ मध्ये धमकीचे इ-मेल आले होते. तर मार्च २०२५ मध्येही डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, आकुर्डी यांना धमकीचा इ-मेल आला होता. प्रत्येकवेळी पोलीस प्रशासनाची धावपळ होते. याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.