आळंदी: १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ, पेरणेफाटा येथे होणाऱ्या ऐतिहासिक शौर्य दिन व अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी आणि संभाव्य कोंडी टाळण्यासाठी व्यापक अधिसूचना जारी केली आहे. पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी मोटर वाहन कायद्यातील तरतुदींनुसार हे आदेश निर्गमित केले असून, ३१ डिसेंबर २०२५ पासून ते १ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे वाहतूक बदल बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून लागू होतील. हे निर्बंध गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत किंवा गर्दी ओसरेपर्यंत कायम राहतील. या कालावधीत चाकण, म्हाळुंगे, दिघी-आळंदी, देहूरोड आणि तळेगाव या परिसरातील वाहतूक वळविण्यात आली आहे. खाजगी आणि जड वाहनांवरील बंदी अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी सामान्य प्रवाशांच्या आणि खाजगी वाहनांच्या प्रवासावर खालीलप्रमाणे मर्यादा असतील: चाकण ते शिक्रापूर पूर्णतः बंद: चाकण ते शिक्रापूर आणि शिक्रापूर ते चाकण या मार्गावर सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांना दोन्ही बाजूंनी प्रवेश बंद करण्यात आला आहे. फक्त बसेसना परवानगी: या मार्गावर केवळ अनुयायांच्या बसेसना प्रवेश मिळेल, परंतु अनुयायांच्या खाजगी कार, जीप किंवा इतर हलक्या वाहनांना या मार्गावरून जाता येणार नाही. आळंदी परिसरातील निर्बंध: चाकण आळंदी फाटा, भारतमाता चौक, मोशी चौक आणि पांजरपोळ चौक येथून आळंदीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व खाजगी जड, अवजड आणि मल्टी-ॲक्सल वाहनांना प्रवेश बंदी असेल. MIDC वाहतूक: चाकण, म्हाळुंगे, मरकळ आणि तळेगाव परिसरातील एमआयडीसीमध्ये कार्यरत असणाऱ्या जड वाहनांना या विशेष कालावधीत अनुयायांच्या मार्गावर येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग आणि वळविलेली वाहतूक (लांब पल्ल्याची वाहने) मुंबईकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि मालवाहतुकीसाठी पोलिसांनी स्वतंत्र मार्ग निश्चित केले आहेत: १. मुंबई ते अहमदनगर (जड व मालवाहतूक वाहने): मुंबईहून येणारे टेम्पो आणि ट्रक वडगाव मावळ येथून एचपी चौक, म्हाळुंगे, वासोली फाटा किंवा वाघजाई नगर मार्गे बिरदवडी गाव, रोहकल फाटा, पुणे-नाशिक रोड, खेड, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटा मार्गे अहमदनगरकडे जातील. २. मुंबई ते अहमदनगर (हलकी खाजगी वाहने): खाजगी कार आणि जीप सारख्या हलक्या वाहनांना वडगाव मावळ येथून तळेगाव-चाकण रोडने चाकण चौक, खेड, पाबळ आणि शिरूर मार्गे अहमदनगरला जावे लागेल. ३. मुंबई-बेंगलोर हायवेवरील बदल: जुन्या हायवेने मुंबईकडून निगडी-पिंपरीकडे येणाऱ्या जड वाहनांना देहूरोड सेंट्रल चौक येथे रोखले जाईल. ही वाहतूक सेंट्रल चौकातून मुंबई-बेंगलोर हायवेने सरळ वाकड नाका आणि चांदणी चौक मार्गे वळविण्यात आली आहे. एक्सप्रेस-वेने पुणे बाजूकडे येणारी जड वाहने उर्से टोलनाक्यावरून वाकड नाका व राधा चौक मार्गे पुणे शहरात प्रवेश करतील. अनुयायांच्या वाहनांसाठी विशेष मार्ग आणि पार्किंग अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांसाठी खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे: नाशिक मार्ग: नाशिककडून येणाऱ्या अनुयायांच्या बसेस चाकण मार्गे शिक्रापूर पार्किंगकडे जातील. तर हलकी वाहने चाकण चौकातून सरळ जाऊन आळंदी, मरकळ मार्गे तुळापूरवरून लोणीकंद पार्किंगकडे वळवली जातील. मुंबई जुना हायवे: येथून येणाऱ्या बसेस वडगाव फाटा, म्हाळुंगे आणि चाकण मार्गे शिक्रापूरला जातील. हलकी वाहने वडगाव फाट्यावरून आळंदी फाटा, मोशी चौक, आळंदी-मरकळ मार्गे तुळापूर आणि लोणीकंद पार्किंगकडे जातील. एक्सप्रेस हायवे: या मार्गावरील हलकी वाहने उर्से टोलनाक्यावरून वळून वडगाव फाटा, चाकण चौक आणि आळंदी मार्गे लोणीकंद पार्किंगकडे जातील. पुणे शहर मार्ग: पुणे शहरातून विश्रांतवाडी किंवा आळंदी फाट्यावरून आळंदीकडे जाणाऱ्या अनुयायांच्या वाहनांना मज्जाव असेल; ही वाहने वाघोली मार्गे लोणीकंद पार्किंगकडे जातील. मरकळ पुलावर ८ फुटी बॅरिकेट्स प्रशासनाने मरकळ गाव येथील इंद्रायणी नदीच्या पुलावर सुरक्षिततेच्या दृष्टीने ८ फूट उंचीचे लोखंडी ओव्हरहेड बॅरिकेट्स बसवले आहेत. यामुळे ८ फुटांपेक्षा जास्त उंचीची कोणतीही वाहने या मार्गावरून जाऊ शकणार नाहीत. फक्त कमी उंचीच्या अनुयायांच्या वाहनांनाच येथून प्रवेश दिला जाईल. नागरिकांसाठी आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, हे आदेश अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी (उदा. रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहने) लागू नसतील. मरकळ एमआयडीसी आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सदस्यांनी आपली वाहने या कालावधीत बाहेर काढू नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे आणि नियोजित प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा.