Ajit Pawar – दादांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असून, त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी दापोडीत त्यांचे भव्य स्मृतीस्थळ उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी सर्वपक्षीय शोकसभेत केली. दापोडीतील हुतात्मा भगतसिंग शाळेत येथे ही सभा झाली. यावेळी आजी-माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि दापोडीसह फुगेवाडी, कासारवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी श्रद्धांजली वाहताना अनेक वक्त्यांना अश्रू अनावर झाले. उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अजितदादांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ एका नेत्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी एक भक्कम आधारवड होते. प्रशासनावरील त्यांची पकड आणि विकासाची दूरदृष्टी यामुळे शहराचा कायापालट झाला, अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.या सभेच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते वैचारिक मतभेद बाजूला सारून एकत्र आले होते. पक्षाच्या भिंती ओलांडून केवळ ‘लोकनेता’ म्हणून दादांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे शहराध्यक्ष शेखर चंद्रकांत काटे यांनी शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी नगरसेविका स्वाती माई काटे, नगरसेवक संजय काटे, राजा बनसोडे, नगरसेविका प्रतिक्षा लांघी (जवळकर), माजी नगरसेवक अविनाश काटे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, आशा शेंडगे, उषा मुंढे, माजी नगरसेवक सनी ओव्हाळ, संजय कणसे, अनिकेत काटे, युवा नेते रवी कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या शोभा पगारे, सुनीता अडसूळे, सामाजिक कार्यकर्ते मनोज वाखारे, निलेश यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्िथत होते.