प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये २०१७ पासून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. अनेक कामांमध्ये रिंग करून आपल्याच बगलबच्यांना काम देण्यात आले आहे. हजारो कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्या मात्र, शहरामध्ये विकासकामे दिसत नाहीत. मोठे रस्ते अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली अरुंद करत वाहतूककोंडी केली जात आहे. त्यामधून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जात आहे. या भ्रष्टाचाराच्या राक्षसाच दहन करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २) पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या सत्ता काळात झालेल्या घोटाळ्यांची यादी वाचली. तर घोटाळे कसे झाले आहेत, हे दाखविण्यासाठी निविदांमध्ये केलेल्या खाडाखोडींची पाने सादर केली. पवार यांनी शहरात सुरू असलेल्या चुकीच्या कामावर बोट ठेवत महापालिकेची धुलाई सुरू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, शहरामध्ये स्मार्ट सिटीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. केबल टाकण्यासाठी १. ५ मीटर खोदकाम आवश्यक असताना फक्त गुडघाभर खोदून पैसे लाटले आहेत. शाळांमध्ये ई क्लासरुमसाठी ५५ हजारांची टीव्ही दीड लाखाला घेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. त्याठिकाणी देखील इंटरनेट नसल्याने मुले शिकू शकत नाही. स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट पार्किंग ॲप आणि सायकल या दोन्ही प्रकल्पांची वाट लावली. डूडूळगाव येथील पंतप्रधान आवास योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. रस्ते खोदाईसाठी शहरात एक नवीन खोदाई माफिया तयार झाला आहे. अनेक खासगी कंपन्या महापालिकेची परवानगी न घेता राजरोसपणे रस्ते खोदतात. शहरातील रस्त्यांचे वाटोळे केले असून नऊ वर्षांत कुठे पार्किंग उभे करता आले नाही. श्रीमंत महापालिका केली कर्जबाजारी महापालिकेच्या ठेवींवर बोलत असताना पवार यांनी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेली पालिका कर्जबाजारी केली असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, महापालिकेची विकासकामे करत असताना आम्ही कधी कर्ज काढले नाही. उलट महापालिकेच्या ठेवी होत्या. मागच्या आठ वर्षांत यांनी आठ हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्या आहेत. महापालिकेला चार हजार कोटी रुपयांचे दायित्व आहे. वरून अनेक कामांसाठी यांनी कर्जरोखे काढले आहेत. हे एक कर्जच आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये यांनी महापालिका कर्जाच्या विळख्यात ढकलली आहे. “२०१७ ला महापालिकेतील मूर्ती घोटाळा झाल्याचे सांगत यांनी तत्कालीन महापौरांवर आरोप केले. आता तेच माजी महापौर त्यांच्या उमेदवार आहेत. गेल्या नऊ वर्षांमध्ये याठिकाणी लुटारुंची टोळी आली असून दिवसाढवळ्या महापालिकेची धुलाई सुरू आहे. दहशत माजवली जात आहे. हे सगळ मोडीत काढण्यासाठी शहरातील जनतेने साथ द्यावी.” – अजित पवार, उपमुख्यमंत्री.