Ajit Pawar – अजितदादा केवळ उपमुख्यमंत्रीच नव्हे तर पुण्याचे पालकमंत्री देखील होते. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले दादा पिंपरी-चिंचवडचे पालक असल्यासारखेच होते. गेल्या तीन दशकांमध्ये अजित पवार यांच्या दूरदृष्टी आणि विकासकामांच्या धडाक्याने शहराला जागतिक पातळीवर उद्योगनगरी अशी ओळख मिळवून दिली.आज त्यांच्या मृत्यूने खऱ्या अर्थाने शहराचा पालक हरपल्याची भावना पिंपरी-चिंचवडकर व्यक्त करत आहेत. उद्योगांचे शहर… उद्यानांचे शहर… प्रशस्त रस्ते असलेले शहर…पायाभूत सुविधांनी सज्ज असलेले शहर… शेतीपासून आयटीपर्यंत प्रत्येक उद्योग आणि व्यवसाय जिथे भरभराटीस येत आहे, असे शहर अर्थात पिंपरी-चिंचवड. या शहराला विविध बिरुदे मिळवून देण्यात अजितदादांचा सिंहाचा वाटा होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शहराची प्रत्येक गरज ओळखून नियोजन करणाऱ्या दादांनी शहराला भरभरुन दिले. अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली या शहराने विकासाची गगनभरारी घेतली आहे. अवघ्या दोन ते तीन दशकांमध्ये पिंपरी-चिंचवडचा अद्भुत विकास पहावयास मिळाला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारांनी आरंभ केलेली विकासयात्रा अखेरपर्यंत अजितदादांनीच चालविली. यामुळेच या शहराला पूर्वेचे डेट्रॉइट असेही म्हटले जाते. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पिपरी-चिंचवड हे एक आदर्श शहर म्हणून नावारूपास आले आहे. पादचारी मार्ग, उन्नत मार्ग, फ्लायओव्हरचे समूह, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन केंद्र, हिरवीगार झाडे जोपासना, वेगवान औद्योगिक बेल्ट विकसित करणे, स्वच्छतागृह, स्वच्छ पाणी, नियोजित रिंग रोड ह्या सर्व अजित पवारांच्या आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक उपलब्धींपैकी काही आहेत. अजित पवारांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा वेग वाढला. आज या शहरात दहा हजारांहून अधिक उद्योग आहेत. या उद्योगांना आवश्यक असणार्या सुविधा देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वाटा आहे. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच या शहराचा नियोजनबद्ध विकास सुरु झाला. अजित पवार यांनी केलेले नियोजन आणि लावलेल्या शिस्तीमुळे महापालिकेला विविध सुविधा व सेवांसाठी विविध सन्मानाने गौरविण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड ज्यात शहर स्वच्छता आणि ई-गव्हर्नन्स निगडीत महत्त्वपूर्ण सन्मानांचा समावेश आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सर्वांत मोठे यश म्हणजे ही एक संपूर्ण ई-गव्हर्नन्स परिपूर्ण महापालिका आहे. जेथे सर्व समस्यांचे निवारण एकाच ठिकाणी होते, तेही विशिष्ट कालावधीत. पीसीएमसीचा ई-गव्हर्नन्स प्रकल्प हा राष्ट्रीय मिशन मोड प्रोजेक्ट अंतर्गत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्नवीकरण मिशन (जेएनएनयुआरएम)च्या सुधारणा आवश्यकतेनुसार मंजूर करण्यात आला आहे. आज महापालिकेच्या स्वतःच्या शंभरहून अधिक शाळा आहेत. समाजातील तळा-गाळातील कुटुंबांनादेखील आपल्या मुलांना उच्च शिक्षण देता यावे, यासाठी महापालिकेच्या शाळा आणि तेथील शिक्षण व्यवस्था सातत्याने कार्यरत असते. यामागेदेखील अजित पवार यांची दूरदृष्टी दिसून येते. शहराचा विकास होत असताना देशाच्या काना-कोपर्यातून नागरिक पोट भरण्यासाठी येथे येणार त्यांच्या मुलांना निःशुल्क उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शहराच्या प्रत्येक भागांत महापालिकेच्या शाळांचे जाळे उभारले. पायाभूत सुविधांसाठी स्वत: घातले लक्ष शहरातील रस्ता आणि वाहतूक व्यवस्थापनामध्ये प्रचंड वेगाने विस्तार दिसून आला आहे, चांगले रस्ते विकासाचा महामार्ग ठरतात, असे सांगणाऱ्या अजितदादांनी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी स्वत: जातीने लक्ष घातले. शहरात आज दिसणारे अनेक उड्डाणपूल, प्रशस्त रस्ते अजित पवारांच्या दूरदृष्टी आणि नियोजनबद्ध विकासाची साक्ष आहेत. आधुनिक पिंपरी-चिंचवड घडवताना शहराच्या मूलभूत समस्यांची यादी दादांनी बनवली. सुलभ दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम कशी होईल, याचाही पूरक अभ्यास केला. यात चांगल्या दर्जाचे रस्ते, सार्वजनिक बससेवा वाढवणे, पर्यायी वाहतुकीचे मार्ग उपलब्ध करून देणे आदीचा समावेश आहे. मेट्रोचे काम वेगाने व्हावे, यासाठी देखील जातीने ते लक्ष घालत होते. वैज्ञानिक दृष्टीकोण नव्या पिढीने विज्ञानाची कास धरावी, यासाठी अजित पवार पालिकेच्या शाळांमध्ये विविध सुविधा तर दिल्याच परंतु सोबतच पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क (पीएसएसपी) हे एक अनोखे विज्ञान शिक्षण केंद्र देखील उभारले. नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम (एनसीएसएम) आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने विकसित या सायन्स पार्कची स्थापना केली गेली. या सायन्स पार्कमध्ये दरवर्षी हजारो विद्यार्थी विज्ञान आणि खगोलशास्त्राच्या गूढ संकल्पना आत्मसात करतात.