प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात इतर तीन आमदार आहेत. शंकर जगताप तुलनेने लहान असल्याने बोलत नाही. विधान परिषदेच्या दोन आमदारांना बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे शहरामध्ये एका भ्रष्टाचारी माणसाच्या हातात सगळा कारभार गेला आहे. त्यामुळे ही खा, मी ही खातो असे करून शहराचे वाटोळे केले असल्याचा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. गुरूवारी (दि. ८) कासारवाडी येथील एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना केला.यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पवार म्हणाले, जे आज माझ्यावर टीका करत आहेत, तो किती पात्रतेचा आहे, हे पाहूनच टीका मनावर किती घ्यायची हे ठरवले पाहिजे. काही जण सुपारीबाज आहेत, त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही. महापालिकेतील सत्तेच्या काळात स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलताना त्यांनी ठाम भूमिका मांडली. जॅकवेल, केबल टेंडरमधील रिंग आम्ही मोडून काढली. पाणी, कचरा, टँकर माफिया, बकालपणा हे गंभीर प्रश्न आहेत. पाण्याच्या व्यवस्थेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आमचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेकजण भाजपमध्ये का गेले असे विचारले असता ते म्हणाले, मी त्यांच्याशी बोललो असता समजल की ते आर्थिक विवंचनेत आहेत. अनेकांवर कर्ज आहे. त्यांना सांगितल आहे की आमच्याकडे आल्यावर काही टेंडर तुम्हाला मिळवून देतो. काहींना स्वीकृत नगरसेवक करतो. त्यामुळे अनेकजण आमिषाला बळी पडून गेले आहेत. आमच मीठ जरा आळणी महापालिका निवडणूक जाहीर होताच अजित पवार यांनी पत्रकार परिषद आणि सभांचा धडाका लावत पुराव्यानिशी आरोप करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, स्थानिक नेते यापूर्वी देखील गप्प होते आणि आताही बोलत नाही. त्यांच्यामध्ये काही लागेबांधे आहेत का असे विचारले असता पवार म्हणाले, आमच मीठ जरा आळणी आहे. माझे कार्यकर्ते शांत असून त्यांना जाग करण्यासाठी मी आलो आहे. पार्थच्या पुढे अजित पवार म्हणून… मुंढवा जमिनीचा तथाकथित घोटाळ्यामध्ये फक्त पार्थच्या पुढे अजित पवार नाव असल्यामुळे ते गाजले. त्या प्रकरणात काही तथ्य नाही. मात्र, मीडियाने ते प्रकरण उचलून धरले. तसे पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांबाबत मीडियाने बोललं पाहिजे.