Ajit Pawar – श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे. माघ शुद्ध दशमीच्या पवित्र दिवशी सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवावर या घटनेचे सावट पसरले असून भाविक वातावरण शोकमग्न झाले आहे.मागील तुकाराम महाराज बीजेच्या सोहळ्याच्या वेळी अजित पवार यांनी श्रीक्षेत्र भंडारा डोंगरास भेट देऊन तुकोबारायांच्या भव्य मंदिर उभारणीची पाहणी केली होती. मंदिर पायथ्याशी सुमारे १०० एकर परिसरात बालाजी देवस्थानाच्या धर्तीवर भव्य कॉरिडॉर उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला होता व या कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने हजारो कोटी रुपयांचा निधी देण्याची ग्वाही दिली होती. सकाळी आठ वाजता आलेले दादा जवळपास तीन तास मंदिर परिसरात थांबून कामाची बारकाईने पाहणी करत होते, ही आठवण आज भाविकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारी ठरली आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे वक्तशीर, स्पष्ट वक्ते व जनतेसाठी अखंड कार्यरत असलेले नेतृत्व आज अचानक हरपले. ही संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी आहे, अशा शब्दांत श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद व वारकरीरत्न छोटे माऊली महाराज कदम यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दादांच्या भेटीची चित्रफीतही दाखविण्यात आली. दरम्यान, नामस्मरणाचा यज्ञ असल्याने बहुरूपी भारुडाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला, तर इतर सांप्रदायिक कार्यक्रम शांततेत पार पडले. सकाळी श्री विठ्ठल-रुखमाई व जगद्गुरु तुकोबारायांच्या मूर्तींची विधिवत पूजा व अभिषेक झाला. दुपारी ह.भ.प. सचिन महाराज पवार यांचे कीर्तन आणि वारकरीरत्न छोटे माऊली महाराज कदम यांची संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित कथा संपन्न झाली. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायासह महाराष्ट्र आज निशब्द झाला आहे.