Ajit Pawar – तळवडे येथील सध्या सुरू असलेल्या महत्वाकांक्षी बायोडायव्हर्सिटी पार्क प्रकल्पाला महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अजित पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पंकज भालेकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी गटनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे, नगरसेवक यश साने, विराज लांडे, शरद ताम्हाणे यावेळी उपस्थित होते.स्व. अजित पवार राज्याचे वित्तमंत्री असताना त्यांनी तळवडे येथील ५९ एकर गायरान जमीन पिंपरी चिंचवड महापालिकेस विनामोबदला हस्तांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे महानगरपालिकेवर पडणारा सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचा आर्थिक बोजा टळला असून शहराच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे. जमीन मनपाच्या ताब्यात आल्यानंतर तिचा उपयोग लोकहितासाठी व्हावा, यासाठी अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी प्रकल्प उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण भूमिकेमुळे आज तळवडे येथील ५९ एकर जागेमध्ये बायोडायव्हर्सिटी पार्क साकारत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या धाडसी आणि लोकाभिमुख निर्णयामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला. अजित पवार या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून, त्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन तसेच पिंपरी चिंचवड महापालिका यांच्याकडून निधी उभारण्यात येणार आहे. शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी अर्थमंत्री अजितदादा यांनी विशेष प्रयत्न केले होते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत बायोडायव्हर्सिटी पार्कसोबतच अत्याधुनिक उद्यान, बहुउद्देशीय खेळाचे मैदान, टर्फ ग्राउंड, वॉकींग ट्रॅक, पोहण्याचा तलाव, मेडिटेशन हॉल, भव्य बहुउद्देशीय सभागृह (इन टेन्साइल रूफ), कुस्ती आखाडा, अस्तित्वातील बैलगाडा घाटाचे नूतनीकरण, सुसज्ज पार्किंग तसेच नागरिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव मनपामार्फत मंजूर करण्यात आला आहे. तळवडे गायरानची ५९ एकर जमीन मनपाच्या ताब्यात मिळवून देण्यात अजितदादा पवार यांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहे. त्यामुळे या बायोडायव्हर्सिटी पार्कला स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी भावना तळवडे ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. हा प्रकल्प तळवडे व संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासाठी अभिमानास्पद ठरणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.