Ajit Pawar – काही नेते शब्दांनी इतिहास घडवतात, तर काही नेते कामांनी इतिहास कोरतात. मावळच्या मातीवर जो ठसा उमटला आहे, तो शब्दांचा नाही, तो विकासाचा आहे. आणि त्या ठशावर एकच नाव कोरलेलं आहे, अजितदादा पवार.मावळच्या रस्त्यावरून जाताना, प्रत्येक पाण्याच्या टाकीकडे पाहताना, प्रत्येक गावाच्या उजळलेल्या चेहऱ्याकडे पाहताना आज दादांची आठवण येते. कारण हा विकास आकड्यांचा नाही, तर लोकांच्या जगण्यात उतरलेला आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, पर्यटन, प्रशासन, मावळच्या प्रत्येक श्वासात आज दादांनी दिलेल्या निर्णयांचा सुगंध आहे.गेल्या पाच वर्षांत आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे आणि अजितदादांच्या ठाम निर्णयामुळे मावळ तालुक्यासाठी सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. हा निधी फक्त कागदावरचा नव्हता, तर मावळचा चेहरामोहरा बदलणारा होता. रस्त्यांवर धूळ उडण्याऐवजी आशा धावू लागली, पाणीटंचाईच्या गावांत जीवन वाहू लागलं, आणि आरोग्यसेवांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा आधार दिला.मावळ तालुक्यातील विविध ठिकाणी नवीन पूल उभारण्यात आले असून, यामुळे ग्रामीण व शहरी भागातील दळणवळण अधिक सुलभ झाले आहे. रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण आणि नवीन जोडरस्त्यांमुळे तालुक्याचा सर्वांगीण संपर्क सुधारला आहे. वडगाव मावळ येथे नवीन न्यायालय इमारत, प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. तसेच श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याशी १०० एकर जागेवर भव्य कॉरिडॉर उभारण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून मावळच्या विकासात ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले. पर्यटनालाही दिली विकासाची जोड मावळ तालुका हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने डोंगरी क्षेत्र आणि पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला. लोणावळा येथील स्काय वॉक प्रकल्पासाठी तसेच कार्ला येथील एकवीरा देवी देवस्थान विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच तालुक्यातील ऐतिहासिक गड-किल्ले लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना आणि राजमाची यांच्या संवर्धन व विकासासाठीही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. एका दिवसात मंजूर झाली पाणी योजना तालुक्यातील मौजे वारंगवाडी गावाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न तत्कालीन उपसरपंच प्रभाकर तुमकर यांनी जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्यासमोर मांडला. त्यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्याकडे मांडला होता. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत १६ जून २००९ रोजी महाजल योजनेअंतर्गत राष्ट्रीय पेयजल निधीतून ५० लाख रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना एका दिवसात मंजूर करण्यात आली. या योजनेतून ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली असून, सुमारे १५०० लोकवस्ती असलेल्या वारंगवाडी गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपलब्ध झाला. या निर्णयामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आणि दुष्काळी परिस्थितीतही गावाला पाणीटंचाईतून बचावले. त्यामुळे १६ जून २००९ हा दिवस वारंगवाडीकर कधीच विसरू शकणार नाहीत.