प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शिवसेने पक्षाकडून ज्यांना जास्त प्रेम, आशिर्वाद मिळाले, ते आता पक्ष सोडून जात आहेत. मात्र, हे जेव्हा आरशात पाहतात तेव्हा त्यांना काय वाटत असेल? स्वतः च्या परिवाराला हे काय उत्तर देत असतील असा माझा प्रश्न आहे. सत्तेची चटक लागलेले पळून गेले. मात्र, सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्यांच्या मागे पळण्यापेक्षा जी जनता सत्ता देते, त्यांच्या सोबत राहणे महत्त्वाचे असते. ज्यांना गुलाम व्हाययचे आहे, ते इतर पक्षात गेले, मात्र निष्ठावंत म्हणून जे आपल्या सोबत आहेत, त्यांच्या सोबत जनता आहे असे म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर टीका केली.पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. विविध पक्षातील तब्बल १७ जणांनी एकाच दिवशी पक्ष बदलल्याने शिवसेने (उबाठा) ने दखल घेत शनिवारी (दि. २०) रात्री वाकड येथील एका हॉटेलमध्ये तातडीने मेळावा घेतला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले. पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, आमदार सचिन आहिर, पिंपरी-चिंचवड शहराचे सह संपर्क प्रमुख केसरीनाथ पाटील, जिल्हा प्रमुख, माजी आमदार गाैतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका अनिता तुतारे, निवडणूक प्रभारी अशोक वाळके, उपजिल्हा प्रमुख रोमी संधू, हाजी दस्तगीर मणियार, शहर समन्वयक कैलास नेवासकर, युवा अधिकारी चेतन पवार, कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, उपजिल्हा संघटिका वैभवी घोडके, कल्पना शेटे, पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश नखाते, निखिल दळवी, गौरी घंटे, वैशाली कुलथे, संतोष म्हात्रे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित हाेते. आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही भाजपबराेबर असताना भ्रष्टाचाराविराेधात लढत हाेताे. मात्र, आता ‘दाग अच्छा है’ म्हणत भाजपवाले सगळे भ्रष्टाचारी, गुन्हे असलेल्यांना पक्षात घेत आहेत. जनता स्वच्छ लाेकांना निवडेल. ती स्वच्छ लाेक आपल्याकडे आहेत. बदल घडवायला आपण सगळ्यांनी तयार राहिले पाहिजे. बदल घडविण्यासाठी आत्मविश्वासाने उभे राहा. जनता तुमच्या पाठीशी उभी राहील, आशिर्वाद देईल. काही प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र, जिंकण्याचे गणित पाहूनच उमेदवार दिले जातील. त्यासाठी समजूतदारपणा दाखविण्याची आवश्यकता आहे. सगळेच चांगले असतात, मात्र, एकच उमेदवार निवडायचा असताे. तर पैशांच्या बॅगा आणायची गरज पडली नसती… सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रूपयांचे दिलेले आश्वासन पाळले नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. पुणे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. सरकारचे काम चांगले असते तर हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा आणून पैसे वाटायची गरज पडली नसती. जनता त्रस्त आहे, ते पर्याय शोधत आहेत. गुलाम म्हणून सरकार सोबत राहिचे की जनतेसोबत राहिचे हे आता आपण ठरविले पाहिजे. पर्याय आपण दिला पाहिजे. शहरीकरण वाढत असून लोकसंख्या वाढत आहे. वाढणारे तरूण शांत बसणारे नाहीत. जगभरात आंदोलनासह मतदानातून बदल होत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.