प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांना दहा हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले.भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे हे भाजपाच्या आयात धोरणाला वैतागून राष्ट्रवादीत गेले आणि त्यांनी आपला संपूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आणला. चार पैकी तीन उमेदवार दहा हजारांपेक्षा अधिक अंतराने विजयी झाले. दहा हजारी प्रभाग प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक २५ हे शहरातील भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुढे आले आहेत. प्रभाग ३ मध्ये माजी महापौर नितीन आप्पा काळजे यांच्या पॅनल सर्व उमेदवार १२ हजारांपेक्षा अधिक अंतराने जिंकून आले आहेत. नितीन काळजे यांना ३०९९२ मते मिळाली आणि ते तब्बल १९६५३ मतांनी विजयी झाले. त्यांचे इतर तीन सहकारी देखील १२ ते १६ हजार मताधिक्यांनी निवडून आले आहेत. याव्यतिरिक्त प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपचे सर्व उमेदवार दहा हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक २६ मधील भाजपच्या उमेदवार स्नेहा कलाटे १४ हजारांहून अधिक तर त्यांच्याच पॅनलमधील सहकारी अॅड. विनायक गायकवाड १२७८४ मताधिक्यांनी जिंकले आहेत. अवघ्या २१ मतांनी विजयी प्रभाग क्रमांक १९ ड मधील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमदेवार सविता आसवानी या अवघ्या २१ मतांनी विजयी झाल्या. तर याच पॅनलमधील भाजपचे उमेदवार मंदार देशपांडे यांना ३१५ मतांनी विजय मिळविता आला. शहरात १६ असे उमेदवार होते ज्यांच्या मतमोजणी वेळी त्यांच्या समर्थकांच्या हृ्दयाचे ठोके वाढले होते. प्रत्येक फेरीगणिक मतांचे अंतर कमी जास्त होते. असे तब्बल १६ उमेदवार एक हजारांपेक्षाही कमी अंतराने निवडून आले. ‘१६’ आकड्याचा अजब योगायोग पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. काही ठिकाणी उमेदवारांना जनतेने विक्रमी मताधिक्य दिले तर काही ठिकाणी मतमोजणी श्वास रोखून धरायला लावणारी होती. या दरम्यान १६ हा आकडा विशिष्ट ठरला. एकूण १६ उमेदवार दहा हजारांहून अधिक मताधिक्य मिळवत निवडून आले तर १६च उमेदवार एक हजारांपेक्षाही कमी अंतराने विजयी झाले आहेत. सर्वाधिक मताधिक्य मिळविण्याचा मान माजी महापौर आणि भाजपचे उमेदवार नितीन आप्पा काळजे यांना मिळाला.तर सर्वांत कमी अंतराने राष्ट्रवादीच्या सविता आसवानी जिंकल्या.दहा हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळविणाऱ्या उमेदवारांमध्ये बहुतेक उमेदवार हे भाजपचे आहेत.