प्रभात वृत्तसेवा पिंपरी – मंगळवारी अर्ज भरण्याच्या अंतिमक्षणी झालेल्या गोंधळात भाजप सह शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील पाच उमेदवारांचे एबी फॉर्म लवकर न दिल्याने त्यांचे अर्ज बाद झाले आहेत. याबाबत उमेदवारांनी मंगळवारी रात्री निवडणूक कार्यालयात गोंधळ देखील घातला. त्यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कार्यालयात धाव घेत आढावा घेतला. मात्र, मुदतीत एबी फॉर्म न आल्याने या पाचही उमेदवारांचा पक्षाचा अर्ज बाद झाला आहे.थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक २१, २३, २४ आणि २७ च्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले. मुदत संपल्यानंतर भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रभाग २४ मधील काही उमेदवार क्षेत्रीय कार्यालयात आले. त्यांनी एबी फॉर्म सादर केले नव्हते. मात्र, मुदत संपलेली असल्याने अधिकाऱ्यांनी एबी फॉर्म घेण्यास नकार दिला. त्यानंतर कार्यालयात मोठा गोंधळ झाला. अधिकारी आणि उमेदवार यांच्यामधील हा वाद वाढत गेला. रात्री उशिरा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ग क्षेत्रीय कार्यालयात धाव घेत उमेदवारांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, उमेदवार एबी फॉर्म घेण्याचा आग्रह करत होते. दुपारी तीननंतर एबी फॉर्म आणला असल्याने तो स्वीकारणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपाचे उमेदवार गणेश गुजर, करिश्मा बारणे, शालिनी कांतीलाल गुजर व शिवसेनेचे रुपाली गुजर व निशा अनिकेत प्रभु यांना पक्षाचा एबी फॉर्म भरता आला नाही. त्यांचे एबी फॉर्म स्वीकारले नसल्याने बुधवारी (दि. ३१) छाननीमध्ये त्यांचे अर्ज बाद झाले. मात्र, त्यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरला असल्यास त्यांना निवडणूक लढवता येईल. मात्र, पक्षाच्या चिन्हावर ते निवडणूक लढवू शकत नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.यामुळे सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसने संतोष बारणे, माया बारणे, वर्षा भोसले, मंगेश बारणे यांना रिंगणात उतरवले आहे. तर शिवसेनेने मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे, पुतणे निलेश बारणे मैदानात आहेत. शिवसेनेने यांच्यासोबतच निशा प्रभू आणि रुपाली गुजर यांना तिकीट दिले होते. मात्र, त्यांचे एबी फॉर्म पोहचलेच नाही. तर भाजपच्या पॅनलमधील फक्त सिद्धेश्वर बारणे यांचा अर्ज एबी फॉर्मसोबत दाखल झाला आहे. तर उर्वरित तीन जणांचे अर्ज बाद झाले आहेत. “एबी फॉर्म दाखल करण्यासाठी तीन वाजेपर्यंत मुदत होती. त्यानंतर आलेले फॉर्म नियमाने स्वीकारता येणार नाही. पक्षाचा एबी फॉर्म नसेल तर अर्ज बाद होईल. त्यांना पक्षाच्या चिन्हावर लढता येणार नाही. मात्र, त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असेल तर ते अपक्ष निवडणूक लढवू शकतात.” – सचिन पवार, उप आयुक्त. निवडणूक विभाग.