प्रभात वृत्तसेवा माथेरान – महाराष्ट्र शासनाने दि. ४ मार्च २०२५ रोजी जारी केलेल्या राजपत्रानुसार माथेरानमधील वर्ग २ च्या मिळकतींचे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे माथेरानमधील बीपी. व एमपी. प्लॉटधारकांना त्यांच्या मालमत्तेचे फ्री-होल्ड स्वरूपात रूपांतर करण्याची उपलब्ध झाली आहे. नगरसेवक शिवाजी शांताराम शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्व मालमत्ता धारकांना आवाहन केले आहे की, त्यांनी जिल्हाधिकारी रायगड व अधीक्षक, माथेरान यांच्या कार्यालयात प्रॉपर्टी कार्ड जोडून विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ असून, या कालावधीत अर्ज करणाऱ्यांना शासनाच्या निर्णयानुसार केवळ २५ टक्के शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर अर्ज केल्यास ५० टक्के किंवा त्याहून अधिक शुल्क आकारले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर माथेरानमधील मालमत्तांना पूर्ण मालकी हक्क (फ्री-होल्ड) मिळणार असून, लीज नूतनीकरणाची दीर्घ आणि त्रासदायक प्रक्रिया संपुष्टात येणार आहे. तसेच बँक कर्ज घेणे सुलभ होणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळकतीच्या वापरासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची गरज राहणार नाही. या निर्णयामुळे माथेरानमधील मालमत्ता बाजाराला चालना मिळून गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फ्री-होल्ड हक्कांच्या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने प्लॉटधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी अधीक्षक कार्यालय, माथेरान येथे संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी केले आहे.