पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी मतदान सुरू आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ६.५६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर साडे अकरा वाजेंपर्यत १६. ०३ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये पुरुष १ लाख ६२ हजार १२५ इतके आहेत. तर १ लाख १२ हजार ५३६ महिलांसह ३ इतर अशा २ लाख ७४ हजार ६६४ मतदारांचा समावेश आहे. महापालिकेतील १२८ जागांसाठी सकाळी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी ६९२ उमेदवार रिंगणात आहेत. मतदान सुरू झाल्यानंतर सकाळी अनेक मतदान केंद्रांवर गोंधळ उडालेला होता. मशिन बंद असल्याचे अनेक केंद्रांवर समोर आले. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ३२ प्रभागांत १२८ जागा असून, ६९२ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ६ व १० मधून अनुक्रमे भाजपचे रवी लांडगे आणि सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता १२६ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी १० हजार ३३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात २ हजार ६७ मतदान केंद्रांमध्ये ७ हजार १४९ मतदान यंत्र (बॅलेट यूनिट), तर २ हजार ९०० कंट्रोल युनिट आहेत.