पिंपरी – महापालिकेच्या निवडणूक कामकाजासाठी खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने प्रशिक्षण घेतले. शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधून ९ हजार ५५९ शिक्षकांना या प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आले होते. मात्र, त्यापैकी १३२९ शिक्षक प्रशिक्षणाला गैरहजर राहिले. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने या शिक्षकांना नोटीस पाठवत प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी शनिवारी (दि. २०) महापालिकेच्या आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहामध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे बंधनकारक असताना देखील हेतुपुरस्सर काही शिक्षक गैरहजर राहिले. निवडणुकीसारख्या राष्ट्रीय कामकाजात त्यांनी अडथळा निर्माण करत भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ मधील तरतुदीचा भंग केला आहे. या गैरवर्तनावरून तुमची राष्ट्रीय कामकाजाप्रती असलेली अनास्था, बेफिकिरी वृत्ती दिसून येत असून तुमचे वर्तन निवडणूक कामकाजात अडथळा निर्माण करणारे आहे. निवडणुकीचा आदेश मोडल्याने तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये याचा लेखी खुलासा नोटीस मिळाल्यापासून २४ तासांच्या आत सादर करावा. समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास अथवा निवडणुकीच्या कामकाजास हजर न राहिल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.