Municipal Election 2026 : मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी आज मतदान सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार वेगवेगळ्या पक्षांना आणि नेत्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. अशातच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपलं मत मांडत असते. महापालिका निवडणुकीला काही तास शिल्लक असताना तिने राज ठाकरे यांचा फोटो शेअर करत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने, “मोठी लढाई लढू. मातीसाठी रं गड्या… मनगटाचा जोर लावून…” अशा गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. मुंबईत उद्धवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात मुख्य लढत होत आहे. तेजस्विनी पंडितने याआधीही महापालिका निवडणुकीबाबत एक पोस्ट केली होती. “भ्रष्ट लोकांच्या हातात पालिका देऊ नका. सुज्ञ, योग्य आणि सुशिक्षित उमेदवार निवडा,” असं आवाहन तिने त्या पोस्टमध्ये केलं होतं. दरम्यान, राज्यातील २९ महापालिकांमधील एकूण २,८६९ जागांसाठी १५,९३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जवळपास नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या महापालिका निवडणुका सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत.