Atharva Sudame : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये परवानगीशिवाय चित्रीकरण केल्याप्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याच्यावर पीएमपीने कडक कारवाई केली आहे. पहिल्या नोटीसला कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे आता दुसरी नोटीस बजावून ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम तात्काळ भरली नाही, तर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. पीएमपीच्या बसमध्ये कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वाहकाचा गणवेश, ई-तिकीट मशीन आणि बिल्ला वापरून चित्रीकरण करण्यात आले होते. या व्हिडीओमध्ये महिला प्रवाशांचा अवमान होईल, महिला सन्मान, प्रतिष्ठा आणि मानसिक सुरक्षिततेला धक्का बसेल, असा आशय असल्याचा आरोप पीएमपीकडून करण्यात आला आहे. हे चित्रीकरण समाजमाध्यमांवर टाकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वासाला तडा जात असून पीएमपीची प्रतिमाही मलीन होत आहे, असा ठपका सुदामे याच्यावर ठेवण्यात आला आहे. याच कारणामुळे २ जानेवारी रोजी पीएमपीकडून पहिली नोटीस पाठवण्यात आली होती. त्या नोटीसमध्ये सात दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आणि संबंधित व्हिडीओ समाजमाध्यमांवरून तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अथर्व सुदामे याने ना व्हिडीओ हटवला, ना नोटीसला उत्तर दिले. दिलेली मुदत संपल्यानंतर आता पीएमपीने दुसरी नोटीस पाठवून ५० हजारांचा दंड त्वरित भरण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले की, कोणतीही परवानगी न घेता आणि महिलांची प्रतिमा मलिन होईल असे चित्रीकरण करण्यात आले आहे. सार्वजनिक बस सेवेवरील विश्वास कमी होत असल्याने कारवाई करणे आवश्यक होते. नोटीस असूनही कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे आता दंडात्मक पावले उचलण्यात येत आहेत.