Year Ender 2025: भारतात आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार अनिवार्य आहे. याच पार्श्वभूमीवर, वर्ष २०२५ मध्ये ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण’ (UIDAI) ने आधारशी संबंधित दोन मोठे बदल केले आहेत. यामध्ये आधार अपडेटच्या शुल्कात केलेली वाढ आणि नवीन सुरक्षित ‘आधार अॅप’चा समावेश आहे. आधार अपडेट करणे आता महागले – २०२५ मध्ये आधार कार्डातील माहिती अपडेट करण्याच्या शुल्कात (Fees) वाढ करण्यात आली आहे. प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी आणि सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे UIDAI ने म्हटले आहे. पूर्वी बायोमेट्रिक अपडेटसाठी (फिंगरप्रिंट, डोळ्यांचे स्कॅनिंग आणि फोटो) १०० रुपये द्यावे लागत होते, आता त्यासाठी १२५ रुपये मोजावे लागतील. तर नाव, पत्ता किंवा जन्मतारीख यांसारख्या बदलांसाठी ५० रुपयांऐवजी आता ७५ रुपये शुल्क आकारले जाईल. ज्या नागरिकांना वयानुसार किंवा तांत्रिक कारणांमुळे वारंवार बायोमेट्रिक्स अपडेट करावे लागतात, त्यांच्या खिशावर याचा काहीसा भार पडणार आहे. नवीन आणि सुरक्षित आधार अॅप लाँच – २०२५ मधील दुसरा सर्वात मोठा बदल म्हणजे UIDAI ने लाँच केलेले नवीन अधिकृत मोबाइल अॅप. हे अॅप जुन्या अॅपपेक्षा अधिक सुरक्षित आणि प्रगत फीचर्सने सज्ज आहे. आता नागरिकांना नेहमी भौतिक (Physical) कार्ड सोबत ठेवण्याची गरज नाही. या अॅपमध्ये आधारचे डिजिटल स्वरूप सुरक्षितपणे जतन करता येईल. अॅपमधील क्यूआर कोडद्वारे त्वरित आधार पडताळणी करता येते, ज्यामुळे ओळख चोरी आणि फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल. घरबसल्या मोबाइल नंबर अपडेट करण्याची सुविधा – या नवीन अॅपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मोबाइल नंबर अपडेट करण्याची सोय. आता नागरिकांना मोबाइल नंबर बदलण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही. घरबसल्या अॅपच्या माध्यमातून हा बदल करता येईल, ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. येणाऱ्या काळात नाव, पत्ता आणि ई-मेल आयडी अपडेट करण्याची सुविधाही याच अॅपमध्ये देण्याचे संकेत UIDAI ने दिले आहेत.