नवी दिल्ली: केंद्र सरकारने नागरिकांना ‘डिजिटल’ बनवण्यासाठी अनेक उपयुक्त मोबाइल ॲप्लिकेशन्स (Apps) सुरू केले आहेत. स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी ही ॲप्स मोठी सोय ठरली असून, यामुळे अनेक महत्त्वाची सरकारी कामे घरबसल्या करणे शक्य झाले आहे. वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत या माध्यमातून होत आहे. सरकारने नागरिक-केंद्रित सेवा, डिजिटल पेमेंट आणि सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी UMANG, BHIM, MyGov, DigiLocker, आणि MADAD यांसारखी ॲप्स आणली आहेत. तुमच्या फोनमध्ये जर ही ॲप्स नसतील, तर तुम्ही अनेक आवश्यक सरकारी सुविधांपासून वंचित राहू शकता. उपयुक्त ५ सरकारी ॲप्स: १. उमंग ॲप (UMANG): ‘UMANG’ हे एक मोठे डिजिटल व्यासपीठ आहे, जिथे तुम्हाला बहुतांश सरकारी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. पॅन (PAN), पेन्शन, शिष्यवृत्ती, ईपीएफओ (EPFO) आणि आधार संबंधित कामे या ॲपद्वारे करता येतात. सरकारी सेवा ऑनलाइन वापरण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. २. भीम ॲप (BHIM): हे सरकार समर्थित ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ (UPI) ॲप आहे. या माध्यमातून तुम्ही क्यूआर (QR) कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता, तसेच थेट बँक-टू-बँक पैसे पाठवू शकता. या ॲपचा इंटरफेस अतिशय सोपा असून, कोणत्याही वयाची व्यक्ती ते सहज वापरू शकते. ३. मायगव्ह ॲप (My Gov): ‘मायगव्ह’ ॲप नागरिकांना थेट सरकारशी जोडते. या ॲपद्वारे नागरिक आपले मत किंवा सूचना सरकारपर्यंत पोहोचवू शकतात. तसेच, ऑनलाइन पोलमध्ये भाग घेण्याची संधी मिळते, ज्यामुळे नागरिकांना देशाच्या निर्णयांमध्ये आणि धोरणांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. ४. डिजीलॉकर (DigiLocker): इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने विकसित केलेले हे ॲप नागरिकांना त्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज (Documents) डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्याची सुविधा देते. ड्रायव्हिंग लायसन्सपासून ते शैक्षणिक प्रमाणपत्रांपर्यंतचे कागदपत्रे फोनमध्ये सुरक्षित ठेवता येतात. यात वापरकर्त्यांना अतिरिक्त १ जीबी (GB) स्टोरेज देखील मिळते. ५. मदत ॲप (MADAD): परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) परदेशात अडकलेल्या किंवा प्रवासात असलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हे ॲप तयार केले आहे. परदेशात असताना तुमचे कोणतेही दस्तऐवज गहाळ झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदतीची आवश्यकता भासल्यास, हे ॲप थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदत करते. परदेश प्रवास किंवा कागदपत्रांशी संबंधित अडचणींवर हे ॲप अत्यंत महत्त्वाचे ठरते.