T20 World Cup 2026 : गतविजेता आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२६ (T20 World Cup 2026) मध्ये आज आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पहिला सामना अमेरिकेविरुद्ध मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व्हायरल तापामुळे पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बुमराहला व्हायरल ताप आला आहे. शुक्रवारी सराव सत्रात तो मैदानावर उपस्थित होता, परंतु त्याने कोणताही सराव केला नाही. संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुमराहला अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात बाहेर बसावे लागणार आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. सिराजला शुक्रवारीच संघात समाविष्ट करण्यात आले होते. T20 World Cup 2026 बुमराहच्या अनुपस्थितीमुळे प्लेइंग इलेव्हनची मर्यादा भारतीय संघाला आणखी एक धक्का म्हणजे वॉशिंग्टन सुंदर अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. सध्या तो बेंगळुरूतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये फिटनेस परत मिळवत आहे. त्यामुळे संघ निवडीसाठी फक्त १३ खेळाडू उपलब्ध आहेत. हर्षित राणाला सराव सामन्यात गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संघात घेण्यात आले. संभाव्य प्लेइंग इलेव्हन भारताच्या फलंदाजीची सुरुवात अभिषेक शर्मा आणि इशान किशन करू शकतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात इशानने सलामीवीर म्हणून ५३ धावा केल्या होत्या. तसेच, तिरुअनंतपुरममध्ये न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने शतक (१०३ धावा) झळकावले होते. संजू सॅमसन सध्या फॉर्ममध्ये नसल्याने, वरच्या फळीतील जबाबदारी इशान किशनवर येऊ शकते. टीम इंडियाला सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती यांसारख्या खेळाडूंकडून मोठी अपेक्षा आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंग, सिराज आणि स्पिनर्सवर असेल. भारत ग्रुप A मध्ये पाकिस्तान, नामिबिया, नेदरलंड्स आणि अमेरिकेसोबत खेळणार आहे. गतविजेता म्हणून सूर्यकुमार यादवच्या संघाने जेतेपद राखण्यासाठी मजबूत सुरुवात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बुमराह लवकरच फिट होऊन पुढील सामन्यांमध्ये उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. हे पण वाचा : Young Cricketer Death : नियतीचा क्रूर खेळ ! सामना रंगात आला असताना क्रिकेटपटूचा हार्ट अटॅकने मृत्यू