प्रभात वृत्तसेवा पुणे – येरवडा कारागृहात दोन कैद्यांनी एकाच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारुन खून केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका कैद्याला बेदम मारहाण झाली आहे. गंभीर जखमी कैदी देवकरप्पा गराळे ( ६५) याच्यावर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी फजिल अहमद अब्दुलकयुम अन्सारी याच्याविरुद्ध हवालदार प्रकाश भोसले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गराळे, अन्सारी दोघांनाही शिक्षा झाली असून कारागृहातील चांगल्या वर्तणुकीमुळे त्यांना खुल्या कारागृहात काम दिले आहे. तेथे बराक क्रमांक एक परिसरात वाद झाल्यावर अन्सारीने गराळे याच्या चेहऱ्यावर ठोसे मारले. यामुळे जखमी गराळे फरशीवर पडला.मारहाणीत गराळे यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने तो गंभीर जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड तपास करत आहेत.गेल्या महिन्यात न्यायालयीन कोठडीतील सराइताने एकाला फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या कैद्याचा ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हाणामारीच्या घटना रोखण्यासाठी आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. नियंत्रण कक्षातून कैद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाते.