प्रभात वृत्तसेवा देऊळगावराजे – यवत (ता. दौंड) येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खळबळजनक हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी अनिल पोपट धावडे याला नियमित जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात सुरुवातीला महिलेचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचे भासवण्यात आले होते. मात्र फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) च्या अहवालानंतर हा मृत्यू हत्या असल्याचे निष्पन्न झाले. सरकार पक्षाच्या मते आरोपीचे मृत महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि ती महिला सातत्याने पैशांची मागणी करत असल्याने आरोपी व सहआरोपींनी संगनमताने दगड व धारदार शस्त्राच्या साहाय्याने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान सहआरोपीच्या कथित अतिरिक्त न्यायालयीन कबुलीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र, बचाव पक्षातर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की, आरोपीकडून कोणतीही संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आलेली नाही. कथित शस्त्र सहआरोपीकडून जप्त करण्यात आले असून संपूर्ण खटला परिस्थितिजन्य पुराव्यांवर आधारित आहे. आरोपी गेल्या एक वर्षाहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत असून खटल्यात अद्याप ठोस प्रगती झालेली नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, आरोपपत्र तसेच तपासातील कागदपत्रांचा अभ्यास करून न्यायाधीश शिवकुमार दिगे यांनी आरोपीस जामीन मंजूर केला आहे अतिरिक्त न्यायालयीन कबुलीचा पुराव्यात्मक दर्जा अंतिम सुनावणीदरम्यान ठरविला जाईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले तसेच न्यायालयाने आरोपीस ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जमीन तसेच एक किंवा दोन जामीनदार देण्याच्या अटीवर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच साक्षीदारांवर दबाव टाकू नये पुराव्यात छेडछाड करू नये आणि आवश्यकतेनुसार संबंधित पोलीस ठाण्यात हजर राहावे असे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. एस. एस. शिंदे, केतन शाहू पवार, अक्षयकुमार झुंबरराव पाठक, योगेश अनिल भोसले, प्रसाद कांचन व राजकुमार काटे यांनी युक्तिवाद केला आहे.