Pune Murder Case : विभक्त रहात असलेल्या पत्नीला पतीने बोलावून तिच्यावर चाकूने चेहऱ्यावर, गळ्यावर वार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना वाडेबोल्हाई येथे जोगेश्वरी हायस्कूलच्या पाठीमागे गुरुवारी (दि.२२) रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. नम्रता शैलेंद्र व्हटकर असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून शैलेंद्र प्रकाश व्हटकर (रा. बकोरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत शाहरुख पठाण (रा. शिरसवडी) याने फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शैलेंद्र व नम्रता यांचा दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. नम्रता हिचे शाहरुख याच्यासोबतचे प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने तो वारंवार भांडण करत होता. नम्रता ही दोन महिन्यापूर्वी शाहरुख याच्यासोबत राहण्यास आली होती. नम्रताचे दागिने शैलेंद्र याच्याकडे असल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी शैलेंद्र याने वाडेबोल्हाई येथे गुरुवारी रात्री नम्रताला बोलावले होते. सव्वा नऊच्या सुमारास शाहरुख व नम्रता दोघेही वाडेबोल्हाई येथे गेले होते. नम्रता व शैलेंद्र दोघे बोलत असताना शाहरुख थोड्या अंतरावर थांबला होता. बोलत असताना शैलेंद्र याने त्याच्याकडील चाकूने नम्रताच्या चेहऱ्यावर, गळ्यावर चाकूने वार केले. ओरडण्याचा आवाज आल्याने शाहरुखने त्याठिकाणी धाव घेऊन वार करीत असताना शैलेंद्र याला ढकलून दिले व आरडाओरडा केला. शैलेंद्र त्याठीकाणाहून चाकू व दुचाकी सोडून पसार झाला. शाहरुखने नम्रताला मित्राच्या मदतीने केसनंद, वाघोली येथील हॉस्पिटलमध्ये नेले होते मात्र डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. शैलेंद्र याला अटक करण्यात आली असून २७ जानेवारी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी सांगितले. हेही वाचा : Pune Crime: मध्यरात्री पद्मावतीत कोयता गँगचा धुमाकूळ; १५ वाहने फोडली, नागरिकांमध्ये घबराट