प्रभात वृत्तसेवा वाघोली – चंदननगर पोलिसांच्या अभिलेखावरील सराईतास पकडण्यासाठी गेलेल्या पथकातील पोलिसांवर गोळीबार केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरातसराईतावर गोळीबार गेल्याने तो जखमी झाल्याची घटना खराडी-आव्हाळवाडी रोड येथे शनिवारी (दि. 20) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार दिलीप भंडारी (वय 26, रा. चंदननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांनी फिर्याद दिली आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील ओंकार भंडारी व आदिल रईस मलिक यांचा शोध चंदननगर पोलीस घेत असताना दोघेही बाईफ कंपनीच्या मोकळ्या जागेत बसलेले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शोध घेतला असता भंडारी तेथे पोलिसांना दिसला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर पिस्टल रोखले. पोलिसांनी सरेंडर होण्यास सांगितले असतानाही त्याने फायर केला. प्रत्युत्तरात पोलीस उपनिरीक्षक ढावरे यांनी भंडारीच्या दिशेने फायर केला. यामध्ये गोळी त्याच्या मांडीमधून आरपार जावून गंभीर जखमी झाला होता. त्यास ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक तपास वाघोली पोलीस करीत आहेत. पोलीस अॅक्शन मोडवर… पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी प्रांजल सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या पथकाने हद्दीमधील वारंवार निर्माण होत असलेली गुन्हेगारांची दहशत कमी करून कायदा सुव्यवस्था राखल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गुन्हेगारांच्या बाबतीत पोलीस क्शन मोडवर आल्याने नागरिकांमध्ये पोलिसांप्रती आदर वाढला आहे.