वाघोली : वाघोलीत वाहनांची तोडफोड करून नुकसान करीत, रस्त्यावरील दुकानांचे सीसीटीव्ही कॅमेरे कोयत्याने तोडून दहशत पसरविणाऱ्या वाघोलीतील पाच पैकी चार अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून आणखी एका तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पाठीमागे, वाघोली-लोहगाव रोडवर गावठाण परिसरात त्याचप्रमाणे गणेशनगर येथील उद्यानाजवळील वाहनांची तोडफोड करून नुकसान करून दुकानांचे सीसीटीव्ही कोयत्याने तोडून दहशत पसरवित असल्याचा प्रकार बुधवारी (दि.१७) मध्यरात्री दीडच्या घडला होता. सदरचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊन संबंधित व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पाच पैकी चौघांना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. चौघेही अल्पवयीन असल्याचे तपासात पुढे आले आहे. आणखी एकजण फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.