प्रभात वृत्तसेवा पुणे – सदाशिव पेठेतील एका ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेला डेटा प्रोटेक्शन बोर्ड आणि पोलीस अधिकारी अशी स्वतःची ओळख सांगत अज्ञाताने तब्बल ३४ लाख ८५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. विशेष म्हणजे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने व्हिडिओ कॉल करुन हा गंडा घातला गेला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.११ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान संशयितांनी व्हिडिओ कॉल व व्हॉट्सअॅपद्वारे फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. त्यांना आधार कार्ड व मोबाईल क्रमांकाचा गैरवापर झाला असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या विरोधात मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे भासवून त्यांना अटक होऊ शकते, अशी भीती गातली. पुढे ऑनलाईन केस प्रोसेसच्या नावाखाली त्यांच्या बँक खात्यातील पैसे सत्यापनासाठी दुसऱ्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादींनी विविध खात्यांतून एकूण ३४ लाख ८५ हजार रुपये आरटीजीएसद्वारे संशयितांनी दिलेल्या खात्यांवर ट्रान्सफर केले. पैसे हस्तांतरित झाल्यानंतर संशयितांनी संपर्क तोडला. संशयितांनी स्वतःला पोलीस अधिकारी त्रिवेदी, परमार आणि वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचे सांगीतले होते. यासाठी त्यांनी व्हिडिओ कॉलचा वापर केला. एक कॉल विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे वर्ग करतो असे सांगून विश्वास संपादन केला. सायबर पोलिसांनी नागरिकांना सतत सावध राहण्याचे आणि कोणत्याही सरकारी, पोलीस प्रक्रियेसाठी आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी थेट संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तरीही लोक अशा फसवणुकीला बळी पडत आहेत. खाते सील होईल तुम्ही प्रॉपर्टी लपवली तर तुमचे बँक खाते आरबीआय सील करेल, अशी धमकी दिली होती. तसेच पैसे पाठविल्याच्या रिसीटही त्यांना पाठवण्यात आल्या. घाबरल्यानंतर फिर्यादीने त्यांच्या सीएशी संपर्क साधला तेव्हा ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या पतीचे (७७) सदाशिव पेठेत प्रसिध्द होमिओपॅथिक क्लिनिक आहे.