प्रभात वृत्तसेवा सातारा – चोरीच्या घटना तशा जिल्ह्यात दैनंदिन होतच असतात. त्याचा तपासही कालांतराने लागतो. मात्र, जकातवाडीत चोरट्यांनी एका घरात चोरी करत जीमचे साहित्य चोरुन नेले. चोरी करताना त्याच घरात एका कागदावर लिंबू, नारळ, बाहुली, पान, हळदी-कुंकू असा उतारा ठेवल्याने या घटनेची चर्चा परिसरात होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून तपस सुरु केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातार्यानजिक बोगद्याच्या पलिकडे असलेल्या जकातवाडीचा विस्तार आता वाढू लागलाय. या ठिकाणी अनेक बंगलेही उभे रहात आहेत. दि. 13 रोजीच्या रात्री जकातवाडीतील उमेश वसंत दळवी हे कामास्तव बाहेरगावी गेले होते. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सर्व जिमचे साहित्य चोरुन नेले. हे साहित्य चोरुन नेताना चोरट्यांनी चोरी करत असताना घरातच नारळ, बाहुली, पान, हळदी-कुंकू असा उतारा ठेवून घटनास्थळ सोडले आहे. ही चोरी निदर्शनास येताच जकातवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकारामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचे चित्र समोर आले असून, चोरी लपवण्यासाठी चोरट्यांनी मुद्दाम अंधश्रद्धेचा आधार घेतला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र या उतार्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संभ्रम पसरला आहे.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.