फरिदाबाद : फरिदाबादमध्ये एका २५ वर्षीय तरुणीवर झालेल्या अमानवीय सामूहिक बलात्कार प्रकरणाची हरियाणा राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल आणि आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी फरिदाबादचे पोलीस आयुक्त सतेंद्र कुमार गुप्ता यांच्याकडे मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सोमवारी संध्याकाळी सेक्टर २३ मधील आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. तिथून घरी परतत असताना मध्यरात्री मेट्रो चौकात ती रिक्ष्याची वाट पाहत उभी होती. यावेळी एका खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेवरील चालकाने तिला लिफ्ट देण्याचे आमिष दाखवले. पीडितेला घरी सोडण्याऐवजी आरोपींनी रुग्णवाहिका गुरुग्रामच्या दिशेने नेली आणि धावत्या वाहनात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. रात्रभर तिला शहरात फिरवून मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास फरिदाबादमधील राजा चौकाजवळ रस्त्यावर फेकून दिले.त्यानंतर पीडितेला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्यावर उपचार करणारे डॉ. अमित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या, ज्यावर शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिच्या उजव्या खांद्यालाही फॅक्चर असून, संमती मिळाल्यानंतर त्यावरही शस्त्रक्रिया केली जाणार आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आरोपींना बेड्या पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपास चक्र फिरवून उत्तर प्रदेशातील मथुरा आणि झाशी येथील दोन आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.मी पीडितेच्या कुटुंबाशी संवाद साधला असून महिला आयोगातर्फे त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. पीडितेची प्रकृती सुधारल्यानंतर मॅजिस्ट्रेटसमोर आरोपींची ओळख परेड घेतली जाईल आणि पुढील चौकशीसाठी आरोपींचा ताबा घेतला जाईल असे हरियाणा राज्य महिला आयोगच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी सांगितले.