प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पैज लावून अतिप्रमाणात दारू पाजल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेताची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवार (दि. ३० डिसेंबर) दुपारी ३ वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथील एका शेतात घडली. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात यांनी बुधवारी (दि. ७) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृष्णा सिंह (वय ३५, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ, जि. पुणे मूळ- रोहतास, बिहार) आणि विकास कुमार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कृष्णा सिंह याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मृत रामकुमार साह याला पैज लावून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात दारू पिण्यास भाग पाडले. दारूच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला वैद्यकीय उपचार दिले नाहीत, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावली. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.