प्रभात वृत्तसेवा पुणे – कात्रज परिसरातील गुजर निंबाळकरवाडी येथे झालेल्या खून प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. ज्या व्यक्तीला या प्रकरणात महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मानले जात होतं, तोच या हत्येत थेट सामील असल्याचे तपासातून उघड झाले आहे. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता खोपडेनगर, कात्रज येथील लेबर कॅम्पजवळील भागात अजयकुमार गणेश पंडित (वय २२, मूळ झारखंड) या युवकाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. त्याचा मृतदेह गोणीमध्ये भरून गुजर निंबाळकरवाडी परिसरातील डोंगरावर टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०३ (१), २३८ अंतर्गत गुन्हा नोंद झाला. अनैतिक संबंधातून खून; पहिला आरोपी अटक या प्रकरणात पहिला आरोपी म्हणून अशोक कैलास पंडित (वय ३५) याला पोलिसांनी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक केली. तपासात उघड झाले, की त्याच्या पत्नीचे मृत अजयकुमारसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याने हत्या केली. ४ लाखांची सुपारी; तीन मित्र आरोपी अशोक पंडितने अजयकुमारच्या तीन मित्रांना ४ लाख रुपये सुपारी देऊन खून घडवून आणला असल्याची कबुली दिली. याप्रकरणी कृष्णकुमार विजयमहतो वर्मा (वय २१), सचिनकुमार शंकर पासवान (वय २६) दोघेही सुपारी किलर, तसेच पहिल्यांदा साक्षीदार आणि नंतर आरोपी रणजितकुमार धनुखी यादव (वय ३०) यांना पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली. रेल्वेमधून फरार, पण पोलिसांचा सापळा कृष्णकुमार व सचिनकुमार मुंबईमार्गे झारखंडला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मोबाईल लोकेशन, ऑनलाइन रेल्वे ट्रॅकिंग यांच्या मदतीने कारवाई केली. ठाणे रेल्वे पोलिसांच्या मदतीने दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सुपारीतील ३,१२,००० रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली. साक्षीदार बनून पोलिसांना गंडविले प्रारंभी आरोपी रणजित यादवने स्वतःला साक्षीदार म्हणून समोर आणले होते. त्याने पोलिसांना, अजयकुमार आणि अशोक यांच्यात वाद झाला. दोघे शेवटचे एकत्र दिसले, अशी माहिती पोलिसांना दिली होती आणि स्वतःवरील संशय दूर केला होता. मात्र, तांत्रिक तपासात तोच खुनात सामील असल्याचे स्पष्ट झाले आणि २३ नोव्हेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली. तपास पथकाचे कौतुक ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, तसेच सपोनि स्वप्निल पाटील यांनी केला. ऑपरेशनमध्ये भारती विद्यापीठ पोलिसांचे अनेक अधिकारी व रेल्वे पोलिसांचे सहकार्य मिळाले.