प्रभात वृत्तसेवा पारगाव शिंगवे – मौज मजा करण्यासाठी मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीस पारगाव पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून एकूण २७ मोटरसायकली हस्तगत केल्या व एकूण १६ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. आंबेगाव तालुक्यातील पारगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. पारगाव पोलिसांनी सापळा रचून आरोपी रितेश फकीरा रोकडे (वय १८, रा. चांडोह, ता. शिरूर), हर्षद जालिंदर ढवळे (वय २१, रा. फाकटे, ता. शिरूर), प्रथमेश दत्तात्रय ढवळे (वय १९, रा. फाकटे, ता. शिरूर) यांना अटक करून २७ मोटार सायकली हस्तगत केल्या. पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ डिसेंबर २०२५ रोजी जारकरवाडी ( ता.आंबेगाव) येथून एक्टिवा स्कुटी चोरीला गेली होती. अॅक्टिवा स्कूटी चोरी गेल्याची तक्रार पारगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली होती. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा शोधण्यात सुरुवात केली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक करून त्यांच्याकडून २७ मोटरसायकली हस्तगत केल्या व १६ गुन्हे उघडकीस आणले. पुणे तसेच अहिल्यानगर,जळगाव, या पोलीस ठाण्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कामगिरी पुणे ग्रामीण अध्यक्ष संदीप गिल्ल व अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे पोलीस अमलदार संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, अविनाश कालेकर यांनी केली. दागिने, मोबाइल केले परत पारगाव पोलिसांनी वर्षभरात मंदिरातील चोरीचे व मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. पोलिसांनी ७ ऑगस्ट २०२४ मध्ये शिरूर आंबेगाव खेड रांजणगाव या परिसरात मदिरांच्या चोऱ्या झाल्या होत्या. यामध्ये देवाचे मुखवटे देवाचे सोन्याचे दागिने व दानपेटीतील पैसे चोरीला गेले होते. या मंदिराच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणून गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. ४ लाख रुपये किमतीचे मंदिरातील ऐवज त्या गावातील मंदिराकडे सुपूर्त केले. तसेच २०२५ रोजी अनेकांचे मोबाईल गाळ झाले होते. पारगाव पोलिसांनी २५ मोबाईलचा शोध लावून आरोपीवर गुन्हे दाखल करून ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात दिले . अशा चोऱ्या आणल्या उघडकीस वर्षभरात सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, अविनाश कालेकर यांनी मंदिरातील देवाचे मुखवटे व सोन्याचे दागिने या चोऱ्या तसेच मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस आणल्या होत्या. आता मोटार सायकली चोरीच्या घटना उघडकीस व मोटरसायकली हस्तगत केल्या हस्तगत केल्या आहेत.