प्रभात वृत्तसेवा जुन्नर – बारव (ता. जुन्नर) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या अविनाश लक्ष्मण लगड याला न्यायालयाने दोषी ठरवत आजीवन कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत चाललेल्या या खटल्यात न्यायालयाने आरोपीला विविध कलमांन्वये दंड आणि कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या निकालामुळे पीडितेला सात वर्षांनंतर न्याय मिळाला आहे.ही घटना २० एप्रिल २०१८ रोजी घडली होती. या संतापजनक घटनेनंतर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. या प्रकरणाची न्यायालयात दीर्घ सुनावणी पार पडली. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने अविनाश लगड याला दोषी ठरवून पोक्सो कायद्यांतर्गत आजीवन कठोर कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड सुनावला. तसेच भारतीय दंड संहितेच्या अन्य कलमानुसार ७ वर्षांचा कठोर कारावास आणि ५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षाही सुनावली आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली आहे.