Thane News : ठाणे शहरात पोलिसांनी एका विशेष मोहिमेदरम्यान १३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ४ किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केले असून, या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एकाचे मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंध होते आणि १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांच्या तपासादरम्यानही त्याचे नाव समोर आले होते. ३ फेब्रुवारीच्या पहाटे केलेल्या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने ६.९ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले, असे पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंग जाधव यांनी सांगितले. पोलिसांनी दिवा परिसरातील एका शाळेजवळून ४७ वर्षीय वजाहत सईद याला या अंमली पदार्थासह पकडले. त्याच्या चौकशीतून त्याचा साथीदार मोहम्मद महाडिक (६७) याला अटक करण्यात आली. हा मुख्य पुरवठादार म्हणून काम करत होता. महाडिक हा १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर लगेचच भारतातून पळून गेलेला आरोपी होता. सुमारे २२ वर्षे फरार राहिल्यानंतर, या काळात त्याने मस्कत आणि ओमानमध्ये बनावट ओळखपत्रावर काम केले आणि नंतर तो गुपचूप देशात परत आला. १९९० च्या दशकातील अंडरवर्ल्डमध्ये तो एक चांगल्या ओळखीचा व्यक्ती होता. महाडिकचा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. त्याचे तेव्हाच्या सर्व टोळ्यांशी, ज्यामध्ये दाऊद इब्राहिम आणि इतरांचा समावेश होता, त्यांच्याशी चांगले संबंध होते. त्याच्यावरती खून, अपहरण, खंडणी आणि बनावट पासपोर्टचे गुन्हे आहेत. दुसऱ्या एका कारवाईत, गुन्हे शाखेच्या पथकाने घोडबंदर परिसरात फरदीन गुलजार मुल्ला नावाच्या ५० वर्षीय रिक्षाचालकाला अडवले आणि ६.६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये मिळून १३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ४ किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या अंमली पदार्थाचा स्रोत आणि संभाव्य ग्राहक शोधण्यासाठी, तसेच अंमली पदार्थ पुरवठा नेटवर्कमधील इतरांना शोधण्यासाठी तपास सुरू आहे, असे डीसीपी जाधव यांनी सांगितले. यासंदर्भात नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.