ठाणे: ओडिशा आणि तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला यश आले आहे. खारेगाव टोलनाक्यावर सापळा रचून पोलिसांनी एका इन्होवा कारमधून तब्बल ६३८ किलो गांजा जप्त केला असून, या कारवाईत एकूण २ कोटी १४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मालमत्ता कक्षाचे पोलीस हवालदार जयकर जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयास्पद इन्होवा कारची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात गांजा साठवलेला आढळला. याप्रकरणी चिन्ना टागुर लक्ष्मण नायक (३६, रा. तेलंगणा) या तस्कराला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला ३ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही तस्करी ओडिशातून कोणासाठी केली जात होती आणि या रॅकेटचे धागेदोरे नेमके कोठे पसरले आहेत, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.