सोलापूर : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी मध्यरात्री भीषण रस्ते अपघात झाला आहे. पनवेलहून अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे देवदर्शन करण्यासाठी निघालेल्या कारला मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला. यात ५ भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीरपणे जखमी झाली आहे.माला साळवे, अर्चना भंडारे, विशाल भोसले, अमर पाटील आणि आनंद माळी अशी मृत्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पनवेलहून अक्कलकोटला देवदर्शनासाठी काही भाविक कारने निघाले होते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आढळली. यावेळी कारमध्ये एकूण सहा प्रवासी होते. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला प्रवासी जखमी झाली. जखमी महिलेस तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कार रस्त्यापासून अंदाजे 10 ते 15 फूट अंतरावर झुडपांमध्ये अडकलेली होती. दरम्यान, मृतदेह बाहेर काढताना पोलिसांनाही प्रचंड कसरत करावी लागली.