प्रभात वृत्तसेवा पिंपरी – रस्ता विचारण्याच्या कारणावरून मारहाण करून अपहरण करून जंगलात सोडून दिले. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलीस पथकाने दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांना ताब्यात घेतले.सुबोध मल्हारी कांबळे (वय २०, रा. श्रीराम काॅलनी, आळंदी रोड, भोसरी), ओंकार संजय कांबळे (वय १८, रा. दिघी), सुरज महादेव शिंदे (वय १९, रा. भोसरी) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुदर्शन महादेव आडे यांनी याप्रकरणी आळंदी पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुदर्शन आडे व त्यांचे मित्र हे थांबलेले असताना संशयित तेथे आले. रस्त्या विचारण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. यातून संशयितांनी फिर्यादी आडे आणि त्यांचे मित्र विकास अर्जून सोनकांबळे, संतोष भाउसाहेब हांबर्डे यांना मारहाण केली. त्याच्याकडून ५०० रुपये रोख रक्कम व दोन मोबाइल फोन काढून घेतला. तसेच छोटा हत्ती टेम्पोमधून फिर्यादीचा मित्र विकास सोनकांबळे आणि संतोष हांबडे यांना घेऊन गेले. आळंदीकडून चाकणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जंगलामध्ये मारहाण करून त्यांना सोडून दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट तीनकडून समांतर तपास सुरू झाला. त्यात पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण केले असता संशयित सुबोध मल्हारी आळंदी येथील देहू फाटा येथे थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने त्याच्या चार साथीदारांसह गुन्हा केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोबाइल फोन, छोटा हत्ती टेम्पो असा एकूण चार लाख सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, उपनिरीक्षक सुनील जावळे, भरत गोसावी, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, अजित रुपनवर, योगेश कोळेकर, शशिकांत नांगरे, निखील फापाळे, बाळासाहेब भांगले व सुंदर थोरात यांच्या पथकाने ही कामगिरी केली.