प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – शिरूर तालुक्यातील वाडा पुनर्वसन येथील एका महाविद्यालयीन युवतीने पोलिसांत दिलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरून जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने पिडीत युवती आणि तिच्या आईला तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसात संतोष मारुती लांडगे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडा पुनर्वसन येथील महाविद्यालयीन युवती घरात एकटी असताना संतोष मारुती लांडगे याने युवतीच्या घरात येऊन तिच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले होते. युवतीने आरडाओरडा केल्याने तो पळून गेला होता. या घटनेनंतर पिडीत युवतीने शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिल्याने पोलिसांनी संतोष मारुती लांडगे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पिडीत युवती व तिच्या आईला तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली. पिडीत युवतीच्या नवीन तक्रारीनुसार, पोलिसांनी संतोष मारुती लांडगे (वय ४८, रा. वाडा पुनर्वसन) याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास महिला पोलीस हवालदार उज्वला गायकवाड करत आहेत.