प्रभात वृत्तसेवा पुणे – पैशाची कमतरता नसलेल्या एका उच्चशिक्षित तरुणाला चोरीचे व्यसन जडल्याचे विमानतळ पोलिसांच्या तपासातून उघडकीस आले आहे. सराफी दुकानात खरेदीचा बहाणा करून बनावट अंगठी ठेवत दुकानातील अस्सल सोन्याची अंगठी चोरण्याची त्याची पद्धत अखेर सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांच्या हाती लागली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी त्याला जेरबंद केले. सैफ दिलीप बेळगावकर (वय २९, रा. केदारेनगर, वानवडी, मूळ रा. सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत २१ वर्षीय तरुणाने विमानतळ पोलिसांत फिर्याद दिली. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता विमाननगर येथील नामांकित ज्वेलर्समध्ये ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २६ नोव्हेंबर रोजी दुकानात काम करीत असताना एक रिंग बनावट असल्याचे मॅनेजर यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, असता २३ नोव्हेंबरला एक तरुण पांढरी हुडी व काळी पँट घालून दुकानात येताना दिसला. रिंग पाहताना तो फोनवर बोलत असल्याचे भासवत ट्रे मधील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरून तिथे स्वतःजवळील खोटी अंगठी ठेवून गेल्याचे दिसून आले. याबाबत गुन्हा दाखल होताच विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा माग काढला. त्यादरम्यान औंधमधील एका सराफी दुकानात तो येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावेळी सापळा रचून पथकाने बेळगावकर याला ताब्यात घेतले. उपनिरीक्षक नितीन राठोड, मनोज बरुरे, अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानेश्वर आवारी, रूपेश पिसाळ, शैलेश नाईक, दादासाहेब बर्डे, हरिप्रसाद पुंडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.