प्रभात वृत्तसेवा पिंपरी – एका १६ वर्षीय बालकाकडे देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतूस आढळून आले. ही कारवाई शनिवारी (दि. ६) सकाळी ११.१५ वा. गावडे नगर, चिंचवड येथे करण्यात आली.गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकमधील पोलीस अंमलदार लक्ष्मीकांत उध्दवराव पतंगे यांनी शनिवारी (दि. ६) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी १६ वर्षे १० महिने वयाच्या चिंचवड येथील मुलावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकजण गावडेनगर, चिंचवड येथील पुलाजवळ संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपये किंमतीचे देशी पिस्तूल व ५०० रुपये किंमतीचे जिवंत काडतूस मिळून आले. शस्त्र विनापरवाना बाळगण्याचा गुन्हा निश्चित झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.