प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – करंजेनगर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धांत नवनाथ सात्रस असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा उरळगाव येथील रहिवासी असलेला सिद्धांत मुंबईमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याचे वडील शिक्रापूर येथे हॉटेल व्यवसाय करतात. १८ डिसेंबर रोजी सिद्धांत मुंबईहून शिक्रापूरला आला होता. हॉटेलवर जाऊन वडिलांकडून घराची चावी घेऊन तो घरी गेला. काही वेळाने त्याचा भाऊ वेदांत घरी पोहोचला असता, त्याला सिद्धांतने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. वडिलांनी नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.या प्रकरणी नवनाथ दादाभाऊ सात्रस यांनी शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांनी या घटनेची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.