प्रभात वृत्तसेवा पिंपरी – सिगारेट न दिल्याच्या कारणावरून किराणा दुकानात महिलेसह दोघांना मारहाण करून तीन हजार ७६० रुपये लुटून नेले. घडली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास श्री आईजी सुपर मार्केट, सम्राट हौसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी येथे घडली. रितेश पोपट सोनवणे (वय २०, रा. माता रमाई हौसिंग सोसायटी, ओटास्किम, निगडी) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बकाराम दयाराम चौधरी (वय ७५, रा. सम्राट हौसिंग सोसायटी, ओटास्किम, निगडी) यांनी बुधवारी (दि. ३) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास आरोपी किराणा दुकानात आला. सिगारेट दिली नसल्याच्या रागातून त्याने फिर्यादी बकाराम चौधरी आणि पुष्पा चौधरी यांना शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपीने दुकानाच्या काउंटरमधील तीन हजार ७६० रुपये काढून आरोपी पळून गेला. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.