प्रभात वृत्तसेवा शिरूर – कवठे येमाई (ता. शिरूर) येथे घरासमोर मोकळ्या जागेत उभी केलेली पिकअप गाडी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमनाथ नथू जाधव (वय २४, रा. कवठे यमाई) यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घरासमोरून वाहन चोरीला गेल्याने परिसरात वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फिर्यादी सोमनाथ जाधव यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून, त्यांनी आपली पिकअप गाडी (MH-14-HG-4415) १५ जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास घरासमोरील पार्किंगमध्ये उभी केली होती. दुसऱ्या दिवशी १६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता पाहिले असता, उभी केलेली गाडी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.चोरीस गेलेल्या या पिकअप गाडीची किंमत अंदाजे ५ लाख रुपये असून, इंजिन व चेसिस क्रमांकासह सविस्तर माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार शरद वारे याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. गावातील वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.