प्रभात वृत्तसेवा शिरू – शहरातील रामलिंग हत्ती रस्ता परिसरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत शिरूर पोलिसांनी थोड्याच अवधित आरोपीला जेरबंद केले आहे. तपास पथक आणि आयकार युनिटच्या संयुक्त प्रयत्नांतून गुन्ह्याचा उलगडा झाला असून, आरोपीकडून तब्बल १ लाख १४ हजार ९०० रुपयांचा चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी फिर्यादीच्या रामलिंग हत्ती रस्ता (जाधव मळा, शिरूर ग्रामीण) येथील घराचे कुलूप तोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २,६०,००० रुपयांचा ऐवज चोरला होता. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्याकडे सोपवला होता. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज व आयकार युनिटचे तज्ज्ञ संदीप चिर्के यांनी दिलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा माग काढला.या तपासात प्रकाश विलास गायकवाड (रा. रामलिंग रोड, शिरूर) यानेच घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस कोठडीत झालेल्या चौकशीत आरोपीकडून १ लाख १४ हजार ९०० रुपयांचा चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पोलिसांनी दाखवलेली तत्परता नागरिकांमध्येही दखलपात्र ठरत आहे.