प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – पुणे जिल्ह्यात सध्या पब संस्कृती आणि त्यातून घडणारे गंभीर गुन्हे चर्चेत असतानाच, ग्रामीण भागातील काही ठराविक कॅफे देखील युवा पिढीसाठी धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. शहरी भागातील पबप्रमाणेच ग्रामीण भागात शाळा आणि महाविद्यालय परिसरात असलेल्या अनेक कॅफेंमुळे तरुण-तरूणी वाममार्गाला लागत असून, व्यसनाधीनता व अनैतिक प्रकारांना खतपाणी मिळत आहे. अनेक कॅफे चालकांनी व्यवसाय वाढवण्यासाठी बेकायदेशीर पार्टीशन आणि पडदे लावून युवकांना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी शिरूर, शिक्रापूर आणि रांजणगाव पोलिसांनी अशा ठिकाणांवर कारवाया केल्या आहेत, परंतु परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. अनेक ठिकाणी अल्पवयीन मुले-मुली तासनतास येथे बसतात आणि त्यांच्याकडून ठराविक रक्कम आकारली जाते. अलीकडेच शिक्रापूर येथे एका महाविद्यालयीन युवतीवर कॅफेमध्ये झालेल्या अत्याचारप्रकरणी पोलिसांनी आरोपीसह कॅफे चालकालाही अटक केली आहे. भरधाव दुचाकी चालवणे आणि अपघातांचे प्रमाणही या संस्कृतीमुळे वाढत असून, पालक व प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे झाले आहे. “शिक्रापूरमध्ये ज्या कॅफेमध्ये युवतीवर अत्याचाराचा प्रकार घडला, त्याबाबत गुन्हा नोंद करून आरोपीसह कॅफे चालकालाही अटक केली आहे. पुढील काळात परिसरातील सर्व कॅफेंची तपासणी केली जाईल आणि चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाई.” – दीपरतन गायकवाड, पोलीस निरीक्षक