प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – केंदूर (ता. शिरूर) येथे पहाटेच्या सुमारास तीन चोरट्यांनी घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवत एका कुटुंबाला मारहाण केली आणि सोन्याचे साडेचार तोळे दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. केंदूर येथील बबन सुक्रे हे आपल्या कुटुंबासह घरात झोपलेले असताना रात्री तीनच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजाच्या सापटीतून हात घालून कडी उघडली आणि घरात प्रवेश केला. बबन सुक्रे जागे झाले असता चोरट्यांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून सर्व दागिने देण्याची मागणी केली आणि त्यांना कोयत्याने मारहाण केली. बबन सुक्रे यांनी आरडाओरडा केल्यावर त्यांची पत्नी लताबाई जाग्या झाल्या. चोरट्यांनी त्यांनाही धमकावून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले आणि घराला बाहेरून कडी लावली.त्यानंतर चोरट्यांनी शेजारील खोलीत झोपलेली सून काजल हिच्या खोलीत प्रवेश केला. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन चोरट्यांनी तिच्या अंगावरील दागिने आणि कपाटातील रोख रक्कम असा एकूण साडेचार तोळे सोन्याचा ऐवज लंपास केला. चोरटे पसार झाल्यानंतर बबन सुक्रे यांनी शेजारील अशोक सुके यांना फोनवरून माहिती दिली. अशोक यांनी येऊन घराच्या कड्या उघडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. बबन दशरथ सुक्रे (वय ७० वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप करत आहेत.