प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – सूर्या हॉस्पिटलसमोर दुचाकीवरून चाललेल्या युवकाच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.संजय नागनाथ रहाटे (वय ३५, सध्या रा. शिक्रापूर, मूळ रा. कंदार, जि. नांदेड) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत वृषभ विनोद कार्लेकर (वय २४, सध्या रा. शिक्रापूर, मूळ रा. कोंढा, जि. चंद्रपूर) यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शुभम शाम सांगळे (रा. महेशनगर, बीड रोड कडा, ता. आष्टी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय रहाटे हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून (एमएच २६ सीजी ११३९) पुणे-नगर महामार्गावरून नगर बाजूने पुण्याच्या दिशेने चालला होता. यावेळी नगरकडून भरधाव वेगाने आलेल्या कारने (एम एच २३ बीसी ५५२२) संजयच्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, कारमधील सर्व एअर बॅग खुल्या झाल्या. अपघातानंतर नागरिकांनी जखमी संजय यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी संजयला मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार उद्धव भालेराव हे करीत आहेत.